धूतपापेश्वर मंदिर हे धोपेश्वर गावातील जागृत स्वयंभू देवस्थान आहे. महादेवाचा अवतार असून सर्व पापांना धुऊन काढणारा देव आहे, म्हणून धूतपापेश्वर हे नाव पडले. चला जाणून घेऊया धूतपापेश्वर देवाची संपूर्ण माहिती :-
ठिकाण :-
मुंबईपासून सुमारे ४५० किमी वर राजापूर शहर आहे आणि राजापूर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर हे धोपेश्वर गाव आहे. गावात धूतपापेश्वर मंदिर आहे.
धूतपापेश्वर देवाची कथा :-
राजापूरात निळोबा भट नावाचे एक गृहस्थ राहत होते. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यात ते समाधानी होते. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे काशीला जात असत. पण नंतर वयोमानामुळे काशीला जाणे शक्य नव्हते. ते शिवभक्त होते त्यामुळे त्यांना शिव दर्शनाची ओढा लागली होती आणि त्यात त्यांच्या घरी असलेल्या गाईने अचानक दूध देण्याचे बंद केले. म्हणून त्यांनी गुराख्याला गाईवर पाळत ठेवयाला सांगितले. एकदा गुराख्याने रानात गाईला झाडाखाली पान्हा सोडताना पहिले, हे पाहून रागावलेल्या गुराख्याने त्या झाडाखालच्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्याबरोबर त्या खडकाचा एक लहान तुकडा उडून कासर्डे गावी पडला आणि त्याचे 'कपालेश्वर' लिंग झाले. गुराख्याने हि घटना निळोबा भटांना सांगितली. निळोबा भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग दिसले. त्यांना ते पाहून खूप वाईट वाटले. आजहि ते स्वयंभू शिवलिंग तुटलेलेच आहे. तुटलेले खडक पाहून गाईने बाजूच्या डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात) आणि गाई पाठोपाठ निळोबा भटांनीही प्रायश्चित म्हणून कोटीतीर्थात देहविसर्जन केले. अशी ही भावपूर्ण कथा आहे.
मंदिर स्थापत्त्य :-
या मंदिराचा लाकडी सभामंडप असून त्याचे छत कौलारू आहे. सभा मंडपाच्या छताला आकर्षक रंगीत पताक्यांची सजावट आहे आणि नक्षीकाम असलेले खांब आहेत. त्यावरील मारुती, कमळ, मासे, मोरपीस असे लाकडातील कोरीवकाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सभोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून मंदिर प्राचीन आहे. मोठे सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह आहे. मंदिरात येताचक्षणी मन शांत आणि प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.
मंदिराची काही खास वैशिष्ट्ये :-
१) मंदिराच्या बाजूला काळ्या कातळावरून खाली झोकून देणाऱ्या मृडानी नदीचे पाणी नजरेला वेगळेच सुख देते. कोसळणाऱ्या पाण्याचा नितांत सुंदर धबधबा आहे. धबधब्याचे खरे सौंदर्य ऐन पावसाळ्यात खुलून दिसते. वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह झाला आहे त्याला “कोटितीर्थ" असे म्हणतात आणि त्यात सुंदर शिवलिंग आहे. त्यावर पाणी पडताना पाहणे हे वेगळे नेत्र सुख आहे.
२) निसर्गाने जणू हिरव्या गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.
३) महादेवाला वाहिला जाणारा कैलासचाफ्याचे सुंदर झाड या एकमेव ठिकाणी पहायला मिळते.
४) धूतपापेश्वर मंदिराच्या बरोबर मागे पूर्ण काळया पाषाणात कामेश्वराचे सुंदर मंदिर आहे.
५) धुतपापेश्वर मंदिरात सुंदर गणेश मूर्ती आहे आणि त्या समोर नवग्रहाची मूर्ती आहे, जणू गणराज नवग्रहांवर लक्ष ठेऊन आहेत.
६) धूतपापेश्वर मंदिराच्या बाजूला धबधब्या पलीकडे दत्तात्रय मंदिर आहे आणि धूतपापेश्वर मंदिरासमोर सुंदर दीपमाळा आणि तीच्या बाजूला श्री वीरभद्र देवाचे मंदिर आहे. दीपमाळेच्या वरच्या बाजूला श्री वेताळेश्वर देवाचे मंदिर आहे.
६) दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा (सोंगट्यांचा) खेळ मांडला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा ह्या सोंगट्या विखुरलेल्या आढळतात. असे दररोज होत नाही आणि होईलच असे नाही शक्यतो (सोमवार, गुरुवार, अमावास्या, महाशिवरात्र, श्रावण सोमवार) यावेळी जास्त होते. येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर-पार्वती येते येऊन सारीपाट खेळून जातात.
७) पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट भेट दिला होता.जो आजही पुजेत वापर करतात.
८) मृडानी नदीच्या काठावर असले हे मंदिर नदीच्या दोन्ही बाजूंच्या मोठ्या डोंगरांमध्ये आहे. मृडानी नदी डोंगरावरून खाली येताना मंदिराजवळच एक धबधबा तयार झाला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात या धबधब्याला भरपूर पाणी असते. पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटक यांची गर्दी असते.
No comments:
Post a Comment